मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही
चंद्रपूर, दि. 13 मार्च : होळी व धुलीवंदन हा उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या कालावधीत काही अतिउत्साही तरुणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी / चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने 13 आणि 14 मार्च या कालावधीत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.
त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हयातील वाढते अपघात कमी करण्याकरीता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तरी होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जाऊ नये, याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.
००००००
No comments:
Post a Comment