जिल्हाधिका-यांकडून ब्रीज बंधारा व लिफ्ट इरिगेशनची पाहणी
चंद्रपूर, दि. 6 मार्च : 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय अधिका-यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय भेटीदरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुल तालुक्यातील मौजा चिरोली येथे ब्रीज बंधा-यांची तसेच लिफ्ट इरिगेशनची पाहणी केली.
यावेळी मुलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, गटविकास अधिकारी श्री. राठोड, चिरोलीच्या सरपंच मिनल लेनगुरे, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम व गावातील व्यक्ती उपस्थित होते.
पाहणी करीत असतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी ब्रीज बंधारा दुरुस्तीबाबत जलसंधारण अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच चिरोली गावातील पाणीपुरवठा योग्यरितीने करण्या बाबत सरपंचांना सांगितले.
चिमढा येथे मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुल तालुक्यातील चिमढा येथील मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण गोडाऊनची पाहणी केली. त्यानंतर गोडाऊन परिसरात वृक्षारोपण करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
००००००
No comments:
Post a Comment