Search This Blog

Tuesday, 18 March 2025

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक काचबिंदू सप्ताह

 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक काचबिंदू सप्ताह

           चंद्रपूरदि. 18 मार्च :   जिल्हा सामान्य रुग्णालय येथे  जागतिक काचबिंदू सप्ताह जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे  यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकरजिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ.  तारासिंग आडेनेत्रशल्य चिकित्सक  डॉ. उल्हास सरोदेडॉ. जिनी पटेलनोडल अधिकारी  विवेक मसराम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. बोरकरडॉ. सावलीकर परिसेविका मंदा बोरकर यांच्यासह एनसीडी कार्यक्रम  व नेत्र विभागातील अधिकारी व कर्मचारी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते.

         यावेळी डॉ. चिंचोळे म्हणाले, काचबिंदु हा एक डोळयाचा छुपा आजार आहे.  या आजारामध्ये रुग्णांना आजार झाल्याचे  कळत नाही.  कारण रुग्णांची समोरची दृष्टी सामान्य  असते,  परंतु बाजूची नजर कमी कमी होत जाते.  म्हणून आपल्या कुटुंबात किंवा  मित्र परिवारात असे रुग्ण आढळल्यास नेत्र  तज्ञांना दाखवून  रुग्णांची दृष्टी वाचवता येते.

           प्रास्ताविकात नेत्रशल्य चिकित्सक डॉ. सरोदे म्हणाले, 100 लोकांमागे  पाच ते सहा रुग्ण काच बिंदूमुळे अंध होतात.  या  आजारामध्ये डोळयाच्या  मध्यभागी असलेल्या विट्रियस नावाच्या द्रव्याचे  प्रमाण जास्त झाल्यास डोळयाचा  दाब  वाढतो व डोळा दुखतो. दाब वाढल्यामुळे आप्टिक नर्व्हला नुकसान होऊ शकते. काचबिंदुची लक्षणे लवकर ओळखणे  कठिण असू शकते.  म्हणूनच नियमित डोळयांची तपासणी करणे आवश्यक आहे. काच बिंदुच्या सुरुवातीच्या काळात डोळा दुखण्याची समस्या जाणवू शकत नाही. पण कालांतराने ती दिसू शकते विशेषत:  बाजूची दृष्टी कमी होणे, समोरचा रंग फिकट  दिसणे हे काचबिंदूचे लक्षण असू शकते. विशेषत: ज्यांना बीपी शुगर व डोका दुखणे हा त्रास असेल व 60 वर्षावरील लोकांना काचबिंदुचा जास्त धोका होऊ शकतो.

        अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर म्हणाले, काचबिंदुच्या आजाराची समाजात जागृती होणे  आवश्यक  आहे. अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे. त्यामुळे रुग्णांची दृष्टी  वाचवता येईल.

कार्यक्रमाचे संचालन नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदुरकर यांनी तर आभार नोडल अधिकारी विवेक मसराम यांनी मानले.

०००००

No comments:

Post a Comment