Search This Blog

Wednesday 14 October 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू

19 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

शेतकरी बंधूंनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोंबर:  नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किडमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू केली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 19 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची व्यावसायिक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील 2 ते 3  वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे.

योजनेचा उदेश:

भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे. रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे.पिक रचनेत बदल घडवुन आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा आहे.

योजनेची व्याप्ती व उद्दीष्ट:

राज्यातील सर्व तालुक्यातील रोपवाटीका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यास किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक तालुक्यांनी प्रवर्ग निहाय खातेदारांची संख्या लक्षात घेऊन वाटप करावयाचा आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटीका उभारणी करणे बंधनकारक असल्यामुळे किमान एक लक्षांक प्रत्येक तालुक्यास देण्यात येत आहे.

लाभार्थी निवड:

अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमिन असणे आवश्यक असुन रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.

लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम:

महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी यांना व्दितीय प्राधान्य देण्यात येईल.भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतिय प्राधान्य देण्यात येईल.

पात्रतेचे निकष:

योजनेअंतर्गत रोपवाटीका पुर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. या घटकाअंतर्गत यापुर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटीकाधारक, शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटीका धारक तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनातुन संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुन:श्च सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत.

समाविष्ट पिके:

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात यावी. यामध्ये रोपवाटीकेची उभारणी करावयाचे घटक व प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. यामध्ये, 3.25 मीटर उंचीचे फ्लॅट टाईप शेडनेट गृह (सांगाडा उभारणी) क्षेत्र संख्या 1 हजार चौरस मीटरसाठी मापदंड रुपये 380 प्रति चौ.मी. असून प्रकल्प खर्च 3 लक्ष 80 हजार इतका आहे. तर 1 लक्ष 90 हजार रुपये लाभार्थ्यास अनुदान रक्कम राहील.

प्लॉसिटक टनेल क्षेत्र संख्या 1 हजार चौरस मीटरसाठी  मापदंड रुपये 60 प्रति चौरस मीटर असुन प्रकल्प खर्च 60 हजार इतका असणार आहे. तर 30 हजार रुपये लाभार्थ्यांस अनुदान रक्कम राहील.

पॉवर नॅपसॅक स्प्रेअर 1 नगसाठी मापदंड रुपये 7 हजार 600 असुन प्रकल्प खर्च 7 हजार 600 आहे. तर लाभार्थ्यास 3 हजार 800 रुपये अनुदान रक्कम राहील.

प्लास्टिक क्रेटस क्षेत्र संख्या 62 साठी मापदंड रुपये व प्रकल्प खर्च 12 हजार 400 असुन लाभार्थ्यांस 12 हजार 400 रुपये अनुदान रक्कम आहे.तर लाभार्थ्यांस 6 हजार 200 अनुदान रक्कम राहील. वरील सर्व घटकासाठी एकत्रित प्रकल्प खर्च 4 लक्ष 60 हजार असून  अनुदान रक्कम 2 लक्ष 30 हजार रुपये राहील.

योजनेची अंमलबजावणी:

सदर योजने अंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी या संकेत स्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुका कृषि अधिकारी  यांचेकडे अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment