Search This Blog

Wednesday 23 October 2019

चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेकरिता 64.48 टक्के मतदान

चिमूरमध्ये सर्वाधिक 74.63 टक्के तर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी 51.02 टक्के
ईव्हीएम मशीन उपविभागीय कार्यालयाच्या गोदामांमध्ये सीलबंद
24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी काल 21 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात पावसाचे सावट असतानासुद्धा 64.48 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान चिमूर विधानसभा क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात झाले. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन संच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात त्याच्या उपविभागीय कार्यालयांच्या गोदामांमध्ये सीलबंद करण्यात आले.
निवडणूक विभागाच्या अंतिम आकडेवारीनुसार 64.48 टक्के मतदान झाले. यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघात 70.95 टक्के मतदान झाले. तर बल्लारपूर क्षेत्रात 62.26 टक्केसोबतच ब्रह्मपुरी क्षेत्रात 71.10 टक्के आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये 62.38 मतदान नोंदवले गेले. विशेष चिमुर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 74.63 टक्के मतदान झाले असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदानात काहीअंशी वाढ दिसून आली आहे. तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.02 टक्के मतदान झाले.
स्ट्राँगरूम मध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन सीलबंद करण्यात आली असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी उपविभागीय कार्यालय चंद्रपूर येथे होणार आहे. तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी प्रशासकीय भवनमुल येथे मतमोजणी पार पडणार आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा रोड येथे होणार आहे. तर चिमूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह तहसील कार्यालय परिसरात पार पडणार आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे होणार आहे. तर राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय परिसरात पार पाडण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment