Search This Blog

Wednesday 23 October 2019

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या तत्परतेने दुर्गापूर येथील मतदान पथकांना मिळाला दिलासा

गैरसमजातून नादुरुस्त व राखीव ईव्हीएम मशीनवर उमेदवारांनी घेतला आक्षेप
पथकांना अडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाला दिली माहिती
शांतता व सलोखा राखल्याबद्दल प्रशासनाने मानले आभार
चंद्रपूर दि २२ ऑक्टोबर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील दुर्गापुर येथील मतदान केंद्रावरून मूल येथील उपविभागीय केंद्राकडे घेऊन जाणाऱ्या नादुरुस्त  व राखीव ईव्हीएम मशीनवरून काल रात्री निर्माण झालेला तणाव जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रसंगावधानाने निवळला. रात्री उशिरा निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती कळविण्यात आली असून सर्व मतदान यंत्रे व निवडणूक कागदपत्रे सुरक्षित असल्याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
         काल मतदानाच्या दिवशी दुर्गापूर येथील मतदान कक्षावरून बाहेर पडलेली क्षेत्रीय अधिकारी डी.जी. मेश्राम झोन क्रमांक १८ यांच्या जीप क्रमांक एम.एच. १८ एस १७०९ यांच्या वाहनासह सर्व निवडणूक ताफा रात्री उशिरा मूल येथे पोहोचल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत सादर करण्यात आला आहे.
            क्षेत्रीय अधिकारी श्री.डी.जी. मेश्राम यांच्या वाहनातील राखीव व नादुरुस्त झालेल्या मतदान यंत्राच्या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडेवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री. राजू झोडे व त्यांच्या समर्थकांना गैरसमज झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जमा झालेल्या जमावाने मतदानानंतर मूल येथे जाणाऱ्या मतदान पथकांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.
             घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. वरील उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी ज्या मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त केला त्या नादुरुस्त व राखीव यंत्रांचे क्रमांक नोंद करून देण्यात आले. तसेच या संदर्भात आक्षेप असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षकांसमक्ष खात्री करून घेण्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील राखीव व नादुरुस्त ईव्हीएम मशीन बाबतची माहिती दिली. तसेच मतदान झालेले यंत्र अन्य वाहनात सुरक्षित असल्याची खात्री करून दिली. त्यांनी घटनास्थळावर भेट देऊन उमेदवार व समर्थकांची समजूत काढल्यामुळे रात्री उशिरा वाहनातील सर्व मतदान यंत्रे सहाय्यक निवडणूक अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या मूल येथील मुख्यालयात रात्री रवाना करण्यात आले.
            यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल व दाखवलेल्या संयमाबद्दल आभार मानले आहे.
            तसेच काल निवडणूक प्रक्रिया झालेल्या यंत्रांना कोणताही धोका नसून ते सर्व सीलबंद आहेत. त्यामध्ये नोंदविलेली मते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच यासंदर्भात कोणतीही अफवा पसरविणाऱ्याना थारा देऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment