Search This Blog

Monday 21 October 2019

नवमतदारात उत्साह : वरिष्ठांना दिसली जबाबदारीची जाणीव चंद्रपूरमध्ये सर्व स्तरातील मतदारांनी बजावला मताधिकार




चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर: एकीकडे कमी मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या वयोगटातील स्तरातील आणि आर्थिक परिस्थितीतील नागरिक सकारात्मक ऊर्जेने लोकशाहीच्या उत्सवाकडे बघताना दिसले. चंद्रपूर शहरातील मतदारांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया लोकशाहीला बळकटी देणाऱ्या ठरल्यात.
·         युवांनी लोकशाही मजबूत करावी
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. या देशाची लोकशाही मजबूत करण्याकरिता सर्वात जास्त संख्येने असलेला युवावर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मत कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. कारण युवावर्गाच्या विचारावरच देशाची भविष्यकालीन वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे कुटुंबातील आम्ही सर्व युवावर्ग मतदानासाठी आलो आहोतअसे मत मातोश्री तुकुम या मतदान केंद्रावर मताधिकार बजावण्यासाठी आलेला समीप बगडे व्यक्त करतो.
·         प्रकृती बिघडली तरी मताधिकार बजावला
 जेव्हापासून मतदार यादीत नाव आहे तेव्हापासून एकदाही मतदान मतदानापासून वंचित राहिले नाही. तब्येत बरी नव्हती म्हणून मतदानापासून वंचित राहणार नाही ना याची भीती वाटत होती. परंतु माझ्या पतीने माझे मनोबल वाढवले व मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावणे शक्य झाले अशी भावना जैनुद्दीन जव्हेरी विद्यालयतुकूम या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या वनिता वासेकर यांनी व्यक्त केली.
·         लोकशाही बळकटीकरणासाठी दिव्यांगही पुढे
दिव्यांग असणारे विवेक डबले यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 1995 ला झालेल्या मोठ्या अपघातात त्यांचे हात पायांना दिव्यांगत्व आले. परंतु या परिस्थितीवर मात करत प्रत्येक मतदानाच्या वेळेस त्यांचा मोठा भाऊ मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन येतो.
·         पायी चालत मतदान केंद्र गाठले
तुकुम मध्ये  राहणाऱ्या विठाबाई सोयाम व सखुबाई नैताम यांनी सत्तरी गाठलेली आहे. तरीपण ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या मदतती विषयी माहिती नसल्याने दोघीही पायी चालत भवानजीभाई विद्यालय येथील मतदान केंद्रावर पोहोचल्या व मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान दिले. यांचे लोकशाही प्रती असलेले समर्पण भावी पिढीने आत्मसात करण्याजोगे आहे.
·         मतदान करून वीर बाबुराव शेडमाके यांना नमन
चंद्रपूर शहरातील आदिवासींनी वेगळाच पायंडा घालून दिलेला आहे. आज शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी चंद्रपुरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे आदिवासी बांधव मतदान प्रक्रियेत सहभागी होईल किंवा नाही याबद्दल प्रशासनात धास्ती होती. परंतु आदिवासी बांधवांनी ज्या  देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके शहीद झाले. त्या देशाची लोकशाही मजबूत करणे परम कर्तव्य मानले. रीतसर मतदान केल्यानंतर आदिवासी बांधवांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त रॅलीचे आयोजन केले.  आदिवासी बांधवांनी मतदान करून खऱ्या अर्थाने शहीदाला श्रद्धांजली अर्पण करून देशात नवा पायंडा निर्माण केला.
·         मतदारांनी घेतला सेल्फीचा आनंद
चंद्रपूर शहरातील 26 मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट विकसित करण्यात आले होते. मतदारांनी मताधिकार बजावल्यानंतर अनेकांनी सेल्फी पॉइंट वर फोटो काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर शेअर करून मित्रांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित केले.
00000

No comments:

Post a Comment