Search This Blog

Friday, 31 January 2025

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूरदि. 31 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 1 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सकाळी 11 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनी – 2025 या कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 12 वाजता मान्यवरांसाठी राखीव, दुपारी 2 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, दुपारी 4 वाजता स्थानिक कार्यक्रमांसाठी राखीव, सायंकाळी 5 वाजता वरोरा कडे प्रयाण, सायंकाळी 7 वाजता जुने कॉटन मार्केट ग्राऊंड वरोरा येथे सरपंच महोत्सवास उपस्थिती, रात्री 8.30 वाजता यवतमाळ कडे प्रयाण.

०००००

मराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास घ्यावा - श्रीपाद प्रभाकर जोशी

 

मराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास घ्यावा - श्रीपाद प्रभाकर जोशी

Ø जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

चंद्रपूरदि. 31 : जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये भाषेचा उपयोग अनिवार्य असून भाषा ही संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. माहितीज्ञानविचारभावना यांची देवाणघेवाण भाषेच्या माध्यमातूनच करता येते. त्यामुळे मराठी भाषेचे जतन करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावाअसे प्रतिपादन श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी केले.

जिल्हा प्रशासनजिल्हा माहिती कार्यालय व मराठी सिटी हायस्कुल,चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने मराठी सिटी हायस्कुलच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल देशमुखचांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक पुल्लावारमराठी सिटी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका महानंदा थोरातहिंदी सिटी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका रोशनी वर्भेमराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पेदोंरजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

संतांनी मराठी भाषेला विकासाच्या प्रवाहात आणून ठेवले, असे सांगून श्रीपाद जोशी म्हणालेमराठी भाषेला दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. आपल्या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कालखंडात मराठीची पायाभरणी केली. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचून भरभराट केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला वैभव प्राप्त करून दिले. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मुकुंदराजांनी विवेकसिंधू नावाचा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला तर श्री.चक्रधर स्वामींनी मराठी भाषेत 'लीळाचरित्रहा ग्रंथ लिहिला होता. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकाज्ञानेश्वरी लिहिली. मराठीतून अनेक काव्यरचना केल्या. संत नामदेवसंत जनाबाईसंत चोखामेळा आदी संतांनी ओव्या व अभंगाच्या माध्यमातून मराठीचे महत्त्व रेखाटले असे ते म्हणाले. यावेळी श्री. जोशी यांनी विविध कविता संग्रहसाहित्यअभंगकालखंडविविध क्षेत्रातील कवीलेखक तसेच मराठी भाषेचा उगम ते इतिहास अधोरेखित केला.

उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख म्हणालेआपल्या पूर्वजांकडून तयार केलेली भाषा अडीच हजार वर्षापासून सुरू आहे. एखाद्या भाषेचे जतन करण्यासाठी त्या भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविकेत बोलताना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणालेशासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. दैनंदिन व्यवहारात तसेच घरी देखील आपण मराठी भाषेचा वापर करतो. संवाद साधण्याचे उत्तम साधन भाषा आहे, असेही श्री. येसनकर म्हणाले.

यावेळी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक पुल्लावारमराठी सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महानंदा थोरात यांनी आपले मत व्यक्त केले. तत्पूर्वीकार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुशील सहारे यांनी मानले.

००००००००

1 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन


 1 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन

Ø पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची असणार उपस्थिती

चंद्रपूरदि. 31 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गतउच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव उपक्रमाचे  आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगानेचंद्रपूर ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन दि. 1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर ग्रंथोत्सवाला आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती असणार आहे.

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शनिवारदि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या आयोजनानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध साहित्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये दुपारी 3 वाजता अभिजात मराठी भाषा व तिचे भवितव्यतर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता समाज माध्यमांचा वाढता प्रभाव व ग्रंथालयांची उपयोगिता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 2 ते 4 वाजता मराठी गझल मुशायरा सादर होणार आहे.

०००००

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन


 राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.31 : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय साख्यिंकी कार्यालयाच्या धर्तीवर "कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चया विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी  ते डिसेंबर 2025 या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सदर पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देशशासकीय आणि खाजगी रुग्णालयदवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील आदी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे.

सदर सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड "एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंबआणि मागील 365 दिवसांमध्ये रुणालयात दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्याअनुषंगानेमाहिती संकलित करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी  ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करतील.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजीत केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून कुटुंब निवडीची प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटूंबीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी विभागाचे आयुक्त तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

०००००००

5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन


 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन

Ø  जिल्ह्यातील 203 लाभार्थी घेणार तीर्थदर्शनाचा लाभ

चंद्रपूर दि. 31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसारमुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी मंदीर (बौद्धगया) तीर्थदर्शनकरीता पात्र करण्यात आले आहे.

5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूरातून रेल्वे जाणार असून दि. 6 फेब्रुवारीला बौद्धगया येथे पोहोचणार आहे. तर दि. 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 7 फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. याप्रमाणे लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी सहायक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर येथे उपलब्ध आहे.

तरीलाभार्थ्यांनी सहायक आयुक्तसमाजकल्याणडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनदुध डेअरी रोडजलनगर वार्डचंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

कारागृहातील 658 बंद्यांची क्षयरोग आरोग्य तपासणी


 कारागृहातील 658 बंद्यांची क्षयरोग आरोग्य तपासणी

Ø  विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूरदि. 31 : जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगानेजिल्हा मध्यवर्ती कारागृहचंद्रपूर येथे क्षयरोग आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात 658 बंदी बांधवांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. शिबिरात 167 बंदी बांधवांचे छातीचे क्ष-किरण करण्यात आले असून 20 संशयीत बंदीवानांचे थुंकीचे नमूने घेण्यात आले.

नागपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निमगडे म्हणाले, दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला किंवा तापवजन कमी होणेथुंकीवाटे रक्त पडणेछातीमध्ये दुखणे तसेच 60 वर्षावरील मधुमेहीएच.आय.व्ही बाधीतधुम्रपान करणारेक्षयरुग्णाचे सहवासीत व्यक्तीकिडणीचे आजार अशा व्यक्तीना कोणत्याही कालावधीचा खोकला असल्यास आपल्या आरोग्याची तपासणी शासकीय दवाखान्यामध्ये मोफत करून घ्यावीअसे आवाहन केले.  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले यांनी समाजातील व्यक्तींनी निक्षयमित्र बनून उपचारावर असलेल्या क्षयरुग्णांना 6 महिन्याकरीता दत्तक घ्यावे व पोषण आहार किट देऊन क्षयरोग मुक्त भारत करण्याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी नागपूरचे आरोग्य सहाय्यक श्री. तांदुळकरवरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक हेमंत महाजन,  सचीन हस्तेटीबी हेल्थ विजीटर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा


 अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा

चंद्रपूरदि. 31 : अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तू स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्य हे रक्कम रु. 3.15 लाख रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अर्टी व शर्ती : स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य तसेच बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.  बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे Ministry of agriculture, & farmers Welfare Department of agriculture, Co-Operation and farmers Welfare यांनी निर्धारित केल्यानुसार फार्ममशिनरीट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीट्युट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत.

पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करुन दिलेल्या उदिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजुर करुन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाथने विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्रास मंजूरी देणाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असेल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी पॉवर ट्रिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहेत्या बचत गटांना यायोजनेचा लाभ घेता येणार नाही.

पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणडॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनदुध डेअरी रोडजल नगर वार्डचंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावाअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

००००००

मोफत विधी सेवा व सहाय्याबाबत मिळणार माहिती

 

मोफत विधी सेवा व सहाय्याबाबत मिळणार माहिती

Ø विधी सेवा व सहाय्याबाबत माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण

Ø जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा स्तुत्य उपक्रम

चंद्रपूरदि. 31 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा व सहाय्याबाबत माहिती देणाऱ्या फलकाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावीया हेतूने तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे देखील अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी. भोसलेजिल्हा न्यायाधीश ईशरत शेखदिवाणी न्यायाधीश प्रवीण शिंदेमुख्य न्यायदंडाधिकारी शेखर गोडसेजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशीजिल्हा सरकारी वकील पी.जी. घट्टुवार तसेच चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षसर्व न्यायाधीशवकील आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

भारताच्या संविधानातील अनुच्छेद 39 प्रमाणे समाजातील गरीब व दुर्बल घटकांना मोफत विधी सहाय्य पुरवण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर आणि सर्व तालुका विधी सेवा समितीमार्फत मोफत विधी सेवा सहाय्य दिले जाते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म म्हणाल्यामोफत विधी सेवेबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशानेजिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायत कार्यालयात सदर सेवेविषयीची माहिती बॅनर्स आणि पोम्प्लेट स्वरूपात पुरविली जाणार आहे. त्याचे अनावरण देखील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले आहे.

2025 या वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या लोक अदालतीच्या तारखांबाबतची माहिती, भांडणतडजोड याबाबत मध्यस्थांची भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकास टोल-फ्री क्रमांक 15100 द्वारे मोफत विधी सल्ला मिळू शकतोयाबाबतची माहिती दिली जाणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी म्हणाले.

०००००००

चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनी व सरस महोत्सव

 

चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनी व सरस महोत्सव

चंद्रपूरदि. 31 : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 फेब्रुवारीपासून जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व सरस महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

तीन दिवसीय या पुशपक्षी प्रदर्शनीमध्ये जातीवंत गाय वर्गातील देवणी, डांगी, खिल्लार, लाल कंधारी, गवळावू, कठाणी तसेच भारतीय गोवंशाच्या गीर, थारपारकर या देशी गायी / वळू तसेच विदेशी जातीच्या संकरीत एच.एफ. व संकरीत जर्सीचे गायी / वळू, त्याचप्रमाणे म्हैस वर्गात नागपूरी, जाफ्राबादी, पंढरपुरी, मु-हा जातीच्या म्हशी / रेडा, शेळी गटात तोतापारी, उस्मानाबादी, बेरारी, बिटल, काठिकयावाडी / कच्छी, बारबेरी, आफ्रिकन बोएर जातीच्या शेळ्या / बोकड, मेंढी गटात दख्खनी मेंढी, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षीगटात कडकनाथ, कावेरी, सातपुडा, असील, सोनारी, गावरान जातीचे कुक्कुट पक्षी व खाकी कॅम्पबेल बदक सहभागी होणार आहेत.

सदर पशुप्रदर्शनात शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित पशुसंवर्धन तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच विविध पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी पशुप्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.

००००००

Thursday, 30 January 2025

जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान

 

जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान

चंद्रपूरदि. 30 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेसहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडामजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललीत पटले,  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आदी उपस्थित होते.

समाजात लपून राहिलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढत त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे, व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणेतसेच 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणेजाडबधीर तेलकट/ चकाकणारी त्वचात्वचेवर गाठी असणेकानाच्या पाळ्या जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणेडोळे पुर्ण बंद करता न येणेतळहात व तळपायावर मुंग्या येणेबधीरपणा अथवा जखमा असणेहाताची व पायाची बोटे वाकडी असणेमनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणेत्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणेहात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणेहातातून वस्तू गळून पडणेचालताना पायातून चप्पल गळून पडणे ही लक्षणे आहे.

जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविकापुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तदनंतर संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करून  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील एकूण लोकसंख्या 18 लक्ष 12 हजार 994, तर एकूण घरे 4 लक्ष 41 हजार 362 करिता ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1537 टीम असणार आहे. सदर कार्यक्रम जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तरीसर्व जनतेने येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

००००००

शेतकऱ्यांनो ! ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा




 शेतकऱ्यांनो ! ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत भेंडवी येथे पाहणी व संवाद

चंद्रपूरदि. 30 : राज्य शासनाने निर्देशीत केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेंडवी (ता. राजुरा) येथे भेट देऊन ऑक्सिजन पार्क, ग्राम ग्रंथालय व अंगणवाडीची पाहणी केली. तसेच शेतक-यांचा एकत्रित डाटाबेस तयार करण्यासाठी राबविण्यात येणा-या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सेाडविण्यासाठी शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेंडवी (ता. राजुरा) येथे भेट दिली.  

ॲग्रीस्टॅकचे महत्व सांगताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांचा व त्यांच्या शेतांचा, आधार संलग्न एकत्रित डाटाबेस तयार करणे, तसेच ॲग्रीसॅट योजनेंतर्गत शेतक-यांचा 7/12, नाव व इतर तपशीलाची जोडणी आधार क्रमांकासोबत करायची आहे. यात हंगामी पिकांच्या माहिती संचानुसार शेतकरी आपल्या शेतीमध्ये असलेल्या शेतपिकाची नोंद ॲग्रीसॅट ॲप मध्ये करू शकतील. त्यामुळे शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सीएससी सेंटरमहाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी किंवा https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्वरीत नोंदणी करावी. ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक यांच्या मार्फत प्रत्येक गावातील शेतक-यांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये शेतक-यांचे 7/12 व इतर तपशील यांची आधार सोबत जोडणी करून फार्मर आयडी तयार करण्यात येईल. तसेच गावनिहाय शेतकरी मेळाव्यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी भेंडवी येथे ऑक्सिजन पार्क, ग्राम ग्रंथालय व अंगणवाडी ची पाहणी केली. तसेच बचत गटातील महिलांशी संवाद साधला. शालेय पोषण आहारबाबत आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक सूचना केल्या व बालकांना वेळेवर पोषण आहार विशेषतः दूध व अंडी देण्याबाबत सूचित केले.

पाहणी दौरा दरम्यान राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, ग्रामपंचायतीचे सरपंचउपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गट शिक्षणाधिकारीग्राम महसूल अधिकारीग्राम विकास अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

ॲग्रीस्टॅक योजनेचे उद्दिष्ट : 1. शेतक-यांच्या शेतांचा, आधार संलग्न माहिती संच, शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच तसेच शेताचा भुसंदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अपडेट करणे. 2. शेतक-यांच्या कल्याणसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ शेतक-यांना सुलभ, पारदर्शक पध्दतीने तसेच वेळेवर उपलब्ध करून देणे. 3. शेतक-यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. 4. शेतक-यांना बाजार पेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे. 5. विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी व शेतक-यांची ओळख पटविण्याची पारदर्शक व सोपी पध्दत विकसीत करणे तसेच प्रमाणीकरणाची सुलभ पध्दत विकसीत करणे. 6. शेतक-यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे आणि 7. उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्री टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे. 

योजनेचे फायदे : 1. पीएम किसान योजनेंतर्गत आवश्यक अटी पूर्ण करून अनुदान प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. 2. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ठ करून घेण्यास सहाय्य मिळेल. 3. किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता राहील. 4. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतक-यांचे नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्व्हेक्षण करण्यास सुलभता येईल. 5. किमान आधारभुत किमतीवर खरेदी मध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल. शेतक-यांसाठी कृषीकर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणा-या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध होईल.

००००००

मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - डॉ.विद्याधर बन्सोड



 

मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - डॉ.विद्याधर बन्सोड

Ø जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

चंद्रपूर दि. 30 : एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत चालली असून व्यावहारीक असलेल्या इंग्रजी भाषेचा पगडा सर्वसामान्यांवर झालेला दिसून येतो. आपल्या बोलीभाषेची लाज न बाळगता त्याचा अभिमान बाळगणे ही सुद्धा भाषा संवर्धनाची पायरी आहे. त्यामुळे मराठी भाषेत संवाद करणेभाषेचा प्रचार-प्रसार करणेभाषेची वाचन संस्कृती जोपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहेअसे मत मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. विद्याधर बन्सोड यांनी व्यक्त केले.

 जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयचंद्रपूरच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयचंद्रपूर येथे करण्यात आले होतेयाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकीता ठाकरेप्राचार्य जयवंत टोंगेप्रा. राजेश बारसागडेवैशाली मुसळेजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

 आपल्या बोलीभाषेवर प्रेम कराअसे सांगून डॉ. विद्याधर बन्सोड म्हणालेनुसतं पुस्तकी बोलण्याने मराठी भाषा टिकणार नाही. तर आपल्या मातृभाषेतून बोलणेसंवाद साधणे खुप महत्वाचे आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. कोणत्याही भाषेचा द्वेष करू नये. आपण सर्व जी भाषा बोलतो, ती अभिजात भाषा आहे. केंद्र शासनाच्या पुढाकाराने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. असेही त्यांनी सांगितले. तसेच जगातील सर्व भाषांवर प्रेम करामोबाईल न वाचता पुस्तके वाचा व ज्ञान आत्मसात करा असा मोलाचा सल्ला देखील डॉ. बन्सोड यांनी  विद्यार्थ्यांना दिला.

उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकीता ठाकरे म्हणाल्याभाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. तंत्रज्ञानाच्या युगात देखील मराठी भाषेचे संवर्धन करणारे लोक आजही आहेत. भाषेच्या संवर्धनाची सुरुवात स्वत:पासून व्हावीअसे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकेत बोलतांना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणालेजिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कुलचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानेमराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाषा ही मनातील भाव व्यक्त करण्याचं उत्तम साधन आहे. भाषेने माणुस समृद्ध होत असतो. बोलण्यातून व्यक्तीमत्वाचं दर्शन घडत असते. आपण सर्व महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगावाअसे जिल्हा माहिती अधिकारी श्री. येसनकर म्हणाले.

 यावेळी प्राध्यापक राजेश बारसागडेवैशाली मुसळे यांनी मराठीचे महत्वजतन व संवर्धनाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वीकार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुशील सहारे यांनी मानले.

०००००० 

 

1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शन

 

1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शन

Ø पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Ø दोनशेपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता समुह होणार सहभागी

चंद्रपूर दि. 30 : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषदचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानेमहिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरीता 1 ते 5 फेब्रुवारी2025 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंडचंद्रपूर येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनी-2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनीचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी विकास विभाग तथा पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे हस्ते पार पडणार आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता समुह सहभागी होणार आहे. दि. 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान रोज सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणाच्या दृष्टीने वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या कौशल्याचे प्रदर्शन व स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये असलेल्या व्यावसायिक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.

चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनीस भेट द्यावीअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

विविध गृहपयोगी उत्पादने असणार विक्रीस उपलब्ध : प्रदर्शनीमध्ये सहभागी गटाच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचेविविध प्रकारच्या चटण्याकडधान्यमसाल्याचे पदार्थखाद्यपदार्थलांबपोळीपुरणपोळीझुनका भाकरमोहाची भाकरजवस चटण्यामातीचे भांडेलोकरी वस्तुलाकडी शिल्पशोभीवंत वस्तूहातसळीचे तांदूळकापडी बॅगटेराकोटागांडूळखत आदींचा समावेश आहे. या सोबतच स्वंयसहाय्यता समूहांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असणार आहेत. यात पुरणपोळीशाकाहारी तसेच मांसाहारी जेवणझुणका भाकरलांब पोळया आदीचा समावेश आहे.

०००००००

1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन


 1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन

Ø  जिल्ह्यातील 203 लाभार्थी घेणार तीर्थदर्शनाचा लाभ

चंद्रपूर दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसारमुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी मंदीर (बौद्धगया) तीर्थदर्शनकरीता पात्र करण्यात आले आहे.

1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूरातून रेल्वे जाणार असून दि. 2 फेब्रुवारीला बौद्धगया येथे पोहोचणार आहे. तर दि. 3 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 4 फेब्रुवारीला सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. याप्रमाणे लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

तरीलाभार्थ्यांनी सहायक आयुक्तसमाजकल्याणडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनदुध डेअरी रोडजलनगर वार्डचंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती गठीत

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती गठीत

चंद्रपूरदि. 30 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करून दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात  औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रात्सोहन मिळावेपोषक वातावरण निर्माण व्हावेगुंतवणूक वाढविण्याकरीता सामूहिक प्रयत्न व गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत.

100 दिवसांचा कृती आराखड्यामधील गुंतवणूकीस प्रोत्साहन (Investment Promotion) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता औद्योगिक धोरण राबविताना जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रात्सोहन मिळावेउद्योग उभारण्याकरीता पोषक वातावरण निर्माण व्हावेजिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होवून औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती होण्याकरीता जमिनीचा वापर सुलभ करण्यासाठी उद्योजकास आवश्यक विविध विभागांकडील अधिकृत माहिती एकखिडकी योजनेनुसार एकत्रित उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती (Industrial Investment Facilitation Committee) गठीत करण्यात आली आहे.

समितीमध्ये संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांची सदस्य तर निवासी उपजिल्हाधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदार/उद्योजकांना आणि व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांची चंद्रपूर जिल्ह्याकरीता नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तरीजिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होवून औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होण्याकरीता औद्योगिक प्रयोजनात जमिनीचा वापर सुलभ करण्यासाठी तसेच विविध विभागांकडील आवश्यक माहिती उपलब्ध करून घेण्याकरीता उद्योजकांनी औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समितीकडे निश्चित कार्यपध्दतीनुसार अर्ज करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

००००००