17 नोव्हेंबर पासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम
Ø 18,12,994 नागरीकांची तपासणी होणार
चंद्रपूर, दि. 14: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य संघटनेचे नॅशनल प्रोफेशनल ऑफीसर डॉ. रश्मी शुक्ला यांच्यामार्फत जिल्ह्याचा कृती आराखडयाची पाहणी करण्यात आली. त्याच बरोबर नागभीड व पोंभुर्णा तालुक्यांना भेटी देऊन 17 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी नागपूर येथील कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राच्या सहाय्यक संचालक डॉ. सोनाली कन्नमवार, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपाली भारती, डॉ. कांचन टेंभुर्णे, अवैद्यकिय सहाय्यक (कुष्ठरोग) पी. के. मेश्राम, आर.एस. त्रिपुरवार उपस्थित होते.
कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट / चकाकणारी त्वचा. त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे. तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे. हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.
हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळून पडणे.
जिल्हयामध्ये सन 2025-26 या वर्षात 17 नोव्हेबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्व कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिंची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर संशयीत कुष्ठरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत निदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सदर मोहिमेकरीता खालिलप्रमाणे कृती नियोजन करण्यात आले आहे.
लोकसंख्या : ग्रामीण भागातील लोकसंख्या 15 लक्ष 80 हजार 521, शहरी भागातील लोकसंख्या 2 लक्ष 31 हजार 211, महानगरपालिका भागातील लोकसंख्या 1 लक्ष 13 हजार 379 अशी एकूण लोकसंख्या 18 लक्ष 12 हजार 994
घरे : ग्रामीण भागातील 3 लक्ष 86 हजार 890, शहरी भागातील 54 हजार 392 आणि महानगर पालिका क्षेत्रातील 26 हजार 101 अशी एकूण 4 लक्ष 41 हजार 362 घरे. यासाठी ग्रामीण भागात 1384 टीम, शहरी भागात 153 टीम तर महानगर पालिका क्षेत्रात 75 टीम अशा एकूण 1537 टीमद्वारे ही शोध मोहीम राबविण्यात येईल.
सदर कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. करीता सर्व जनतेने येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन , जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडम यांनी केले आहे.
००००००
.jpeg)
No comments:
Post a Comment