मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा 2-3 तासांची सवलत देण्याचे आदेश
चंद्रपूर, दि. 29 : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदान करण्याकरीता चंद्रपुर जिल्हयात काम करणा-या कामगार मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2 ते 2 तासाची सवलत देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील, (खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.)
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 ते 3 तासांची सवलत मिळेल. याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
वर नमूद केल्यानुसार आस्थापनांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, अशी तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपुर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा ई-मेल द्वारे assttcommrchd @gmail.com तक्रार करावी, असे कामगार विभागाने कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment