Search This Blog

Saturday 27 June 2020

डोंगरहळदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू

डोंगरहळदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू
चंद्रपूर दि. 27 जून: दिनांक 22 जून रोजी एका वर्तमानपत्रांमध्ये डोंगर हळदी पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर या मथळ्याखाली योजना मागील 15 दिवसांपासून ठप्प त्यामुळे डोंगर हळदी व परिसरातील गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, अशा प्रकारची बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीचे खंडन करीत डोंगर हळदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग दशरथ पिपरे यांनी दिली आहे.
मौजा डोंगरहळदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ता. पोंभुर्णा जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत देखभाल व दुरूस्ती करण्यात येते. या योजनेतून सहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेत मौजा हेटी येथील मुख्य साठवण टाकी भरण्याकरिता 140 मीमी,6 केजी पीव्हीसी पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पोंभुर्णा अंतर्गत समाजभवनाचे व राजराजेश्वर मंदिराचे काम सुरू करण्यात आले होते. मंदिराच्या जागेतून योजनेची पाईपलाईन गेलेली असल्याने मंदिराचे खोदकाम करीत असताना पाईपलाईन फुटल्याने दिनांक 14 जून 2020 पासून योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित झालेला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले असून दुरुस्ती करून देण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतु कोणत्याही प्रकारची पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
मंदिराच्या जागेतून जाणारी पीव्हीसी पाईप लाईन वळती करणे गरजेचे होते. त्याबाबतचे अंदाज पत्रक दिनांक 16 जून 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीकरिता येणारा खर्च भरण्याची हमी दिल्यामुळे डोंगरहळदी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्ती व पाईप लाईन वळती करून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे काम पूर्ण करण्यात आले. या योजनेद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग दशरथ पिपरे यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment