महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीकरिता चंद्रपूर जिल्ह्यात 1643 मतदार
Ø 26 एप्रिल रोजी मतदान
चंद्रपूर, दि. 25 : निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 26 एप्रिल 2026 रोजी पार पडणार आहे. वैद्यकीय परिषदेवर नऊ सदस्यांची निवड करण्याकरिता एकूण 60 उमेदवार रिंगणात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1643 पात्र मतदारांकडून गुप्त मतदानाद्वारे मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येईल.
सदर मतदान रामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असून एकूण तीन मतदान केंद्र आहेत. यात खोली क्रमांक 1 अधिष्ठाता यांच्या दालनासमोरील कक्षात 1 ते 544 मतदारांचे मतदान, खोली क्रमांक 2 परिचारिका कक्षात 545 ते 1087 मतदारांचे मतदान तर खोली क्रमांक 3 प्रशासकीय अधिकारी यांच्या दालनात 1088 ते 1643 मतदारांचे मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 असून या कालावधीत सर्व पात्र मतदारांनी ठरवलेल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची मूळ प्रत मतदान केंद्राध्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे. यात 1) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र (छायाचित्र नसल्यास इतर फोटो आयडी प्रूफ सोबत) 2) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र, 3) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले कोणतेही छायाचित्रासह ओळखपत्र.
मतदान केंद्रात मोबाईल फोन व व्हिडिओ कॅमेरे आणण्यास परवानगी राहणार नाही. प्रत्यक्ष मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण मतदान प्रक्रिया नोंदविण्यात येणार आहे. उमेदवाराने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी संबंधित मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतो. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी निवडणुकीच्या नियमांचे पालन करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2026 पारदर्शकपणे, निष्पक्ष व कुठलाही अनुचित प्रकार न घडता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व डॉक्टर व संबंधितांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000000
No comments:
Post a Comment