महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी प्रशासनाचा पुढाकार
Ø जिल्ह्यातील कार्यालयामध्ये ‘पॉश ऑडिट’
चंद्रपूर, दि. 07 : जिल्ह्यात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 (पॉश ॲक्ट) ची प्रभावी अंमलबजावणी तसेच कार्यस्थळी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळ व खाजगी कार्यालयामध्ये संबंधित विभाकडुन पॉश ऑडिट राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे.
पॉश ॲक्ट अंतर्गत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करणे, समिती फलक लावणे, कर्मचाऱ्यांना कायद्याबाबत प्रशिक्षण देणे, कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ‘शी बॉक्स’ पोर्टलवर संबंधित कार्यालयाच्या नोंदीसह अंतर्गत समितीची माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये या तरतुदीची प्रभवी अंमलबजावणी होत आहे का ? याची सखोल पडताळणी ‘पॉश ऑडिट’ द्वारे करण्यात येणार आहे
सहायक आयुक्त कामगार विभागाकडून खाजगी कार्यालयांचे नियमित ऑडीटसह पॉश ऑडिट करण्यात येणार असून त्यानंतरच परवाना नुतनीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी व म.औ.वि.म. उपअभियंता हे देखील खाजगी शाळा व उद्योग/ कारखाने यांचे पॉश ऑडिट करणार आहे. या कायद्याच्या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कार्यालयावर 50 हजारपर्यंत दंडात्मक कार्यवाहीसह आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment