जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न
चंद्रपूर, दि. 26 : जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्ह्यात हिवताप प्रतिबंध, निर्मूलन व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास सहा संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. नयना दुफारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या, तर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले यांनी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राहुल भोंगळे (बालरोग तज्ञ, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर) व डॉ. सचिन कुमरे (सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात हिवतापाचे संशोधक डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविकात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी मागील पाच वर्षांतील हिवताप परिस्थितीचा आढावा घेतला. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृतीमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे त्यांनी नमूद केले व नागरिकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
विशेष अतिथी डॉ. नयना दुफारे यांनी जिवती तालुक्यासारख्या अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हिवताप निर्मूलनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत नागरिकांच्या सहभागातून सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ललित पटले यांनी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून गावागावात प्रभावी जनजागृती करून हिवताप निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध आरोग्य विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, किटकशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा अधिकारी आदींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमस्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती साहित्याचे प्रदर्शनही करण्यात आले.
जिल्हा हिवतापमुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सोनाली गायकी यांनी तर आभार प्रशांत चात्रेश्वर यांनी manale. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.
०००००००
No comments:
Post a Comment