दंत विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 21 : दंत विभाग, जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय व इंडियन सोसायटी ऑफ पेरीडोन्टलॉजी ॲन्ड इप्लांटोलॉजी यांच्या वतीने सोमवारी (दि.20) जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने ‘ अ हॅपी माऊथ, अ हॅपी लाईफ’ या घोषवाक्यासह जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वात माऊंट कार्मेल स्कूल येथे आरोग्य वार्ता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. पिपरे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक मौखिक आरोग्य दिनाची निर्मिती आणि मौखिक आरोग्याचे महत्व, दातांची घ्यावयाची काळजी, दातांना होणारे विविध आजार व त्यावरील उपचार व उपाययोजना तसेच दातांचे मानवी जीवनातील महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मौखिक आरोग्याची शपथ दिली.
सदर कार्यक्रमात डॉ.रश्मी डोंगरवार यांनी विद्यार्थ्यांना दातातील कीड कोनकोणत्या भागावर लागत असते, याविषयी कारणे, लक्षणे, निदान, उपचार आणि प्रतिबंध याविषयी माहिती दिली. तसेच दिवसातून 2 वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी फ्लोराइड टूथपेस्टने ब्रश करा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. दीपशिखा राजूरकर यांनी विद्यार्थ्यांनी दात साफ करण्याच्या शास्त्रीय पद्धतीचा प्रत्येकाने अवलंब करावा, ह्या दृष्टीने प्रात्यक्षिक करून दाखविले.
या प्रसंगी दंत आरोग्यक प्रशांत मरसकोल्हे, दंत सहाय्यक सचिन जुमडे यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
०००००
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment