Search This Blog

Tuesday 29 September 2020

धान पिकावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

धान पिकावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर : सदयस्थितीत पूर्व विदर्भात धानावर तुडतुडयांच्या प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. पिकावर तपकिरीपांढऱ्या पाठीचे व हिरवे तुडतुडे प्रादुर्भाव करतांना आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे अधिक नुकसानकारक असतात व त्यांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात दिसून येतो. हिरवे लुसलुशीत दाटलेल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तसेच या महिण्याचा शेवटचा आठवडा व ऑक्टोबरचा पहिला पंधरवाड्यात प्रादुर्भाव पोषक वातावरणामुळे हमखास वाढून नुकसान संभवते. तसेच शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणाचे त्वरीत उपाय करावेअसे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रौढ व पिल्ले खोडावर समुहाने राहुन खोडातील रस शोषण करतात त्यामुळे झाड पिवळे कमकुवत होते. झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या लोंब्यावर विपरीत परिणाम होवून दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते. या तुडतुडयामुळे झाडामध्ये विषाणुंची लागण होते त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पिक गवतासारखे खुरटल्यासारखे दिसते व लोंब्या करपल्यासारख्या दिसतात.

जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रामुख्याने बांधीच्या मध्यभागी पिक करपल्यासारखे गोलागार खडगे पडतात. अशी झाडे पिवळी पडून करपतात व खाली पडतात. उत्पादनात लक्षनीय घट येते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ निरीक्षण केल्यास असंख्य प्रमाणात तुडतुडे दिसून येतात बरेचदा प्रादुर्भावग्रस्त झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळी बुरशीची वाढ  होते. पोषक वातावरणात हा प्रादुर्भाव वाढून संपुर्ण बांधीमध्ये पसरतो.

असे करा तुडतुड्यांचे व्यवस्थापन:

वाजवीपेक्षा नत्र खताचा वापर करू नये. कारण हिरव्या लुसलुसशीत व दाटलेल्या पिकात प्रादुर्भाव जास्त असतो. टेहाळणीसाठी प्रकाश सापळयांचा वापर करावा. प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी सोयीनुसार 3 ते 4 दिवसासाठी बाहेर सोडावे.

प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर मेटॅरायझियम अनिसोप्ली 1.15 टक्के भुकटी या जैविक बुरशीचा 2.5 किलो हे याप्रमाणे बांधीमध्ये वापर करावा. ही भुकटी 10 ते 15 किलो कुजलेल्या शेणखताच्या पावडरमध्ये चांगले मिसळून तसेच  1 ते 2 दिवस झाकून ठेवावे म्हणजे त्यामध्ये हया जैविक बुरशीची वाढ होवून त्याची परिणामकारकता वाढते. आवश्यकता भासल्यास परत 15 दिवसांनी परत या जैविक बुरशीचा वापर करावा.

रासायनिक किटकनाशकांची अनावश्यक फवारणी टाळून भक्षक व इतर परोपजीवी किटकांचा संवर्धन व संरक्षण करावे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 16 मिली. किंवा इमिडॅक्लोप्रीड 17.8 टक्के 2.2 मि.ली. किंवा फिप्रोनिल टक्के 20 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.50 मि.ली. किंवा इथोफेनप्रॉक्स 10 टक्के प्रावाही 10 मि.ली फ्लोनीकॅमीड 50 टक्के 3 ग्रॅम किंवा  थायोमेथाक्झाम 25 दाणेदार ग्रॅम यापैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाची 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करावी.पायरेथ्राईड वर्गातील किटकनाशके वापरू नयेत्यामुळे तुडतुडयांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

00000

No comments:

Post a Comment