Search This Blog

Saturday 12 September 2020

दुसऱ्या दिवशीही केंद्रीय पथकाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी





 

दुसऱ्या दिवशीही केंद्रीय पथकाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

घरे व शेतपीक नुकसानीचा आढावा ; नागरिकांशी संवाद साधून घेतली माहिती

चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर : वैनगंगा नदीला आलेल्या पुराने ब्रह्मपुरी तालुक्याला मोठा फटका बसला. घरे, शेतीजमीन, पीक यासोबतच  रस्ते, महावितरण आणि  जलसंपदा इत्यादी विभागाच्या सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज दुसऱ्या दिवशी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, बेळगाव, किन्ही या नदीलगतच्या गावात पुरामुळे झालेल्या नुकसानीची गावांमधील पडझड झालेल्या घरांचे व शेतातील पीक आणि सार्वजनिक मालमत्तेच्या   नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला.

29 ते 31 ऑगस्ट या तीन दिवासात गोसिखुर्द धरणाचे 33 दरवाजे 5 मीटरने उघडून 30 हजार 657 क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडल्यामुळे नदीला पूर आला. या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदीलगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने बिकट परिस्थिती  निर्माण झाली होती. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शनिवारी जिल्हयातील ब्रह्मपुरी  तालुक्यातील लाडज, बेळगाव, किन्ही या गावांची पाहणी करून पथकातील अधिकात्यांनी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे  सहसचिव जी. रमेशकुमार गांता, तर कृषी मंत्रालयाचे  संचालक आर पी सिंग, रस्ते व परिवहन विभागाचे अधीक्षक अभियंता  तुषार व्यास यांचा समावेश होता.

यावेळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी  क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, उपविभागीय कृषी अधिकारी शिरिष भारती, तालुका कृषी अधिकारी श्री.खंडाळे, महावितरण चे अधिक्षक अभियंता विजय मेश्राम, उपविभागीय अभियंता श्री.निखार,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सातपूते, ग्रामसेवक निर्मला इंगोले उपस्थित होते.

ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावातील नीलकंठ लोणारे, विजय मेश्राम, विश्वनाथ कुमरे, विजय नखाते  यांच्या शेतात जाऊन झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने केली. लाडज गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील 60 घरे पूर्णतः पडली असून  25 घरे अंशतः पडली तर  जनावरांचे 18 गोठे पाण्यात वाहून गेले.

त्यासोबतच केंद्रीय पथकाद्वारे बेलगाव गावातील सखुबाई वाघदरे, जितेंद्र दिघोरे, रघुनाथ आबोंने, गोपीचंद आंबोने, सेवक बगमारे यांच्या पडलेल्या घराला भेट देऊन पाहणी करण्यात आली.तर रमेश पचारे, अविनाश तुकटे, नारायण तुकटे यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेत पिकाची पाहणी करण्यात आली. या गावातील 16 घरे पूर्णता पडली असून, 47 घरे अंशत: पडली आहे. त्यासोबतच पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे.

पुरामुळे नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात गावात जमा झाला असून एनडीआरएफ व एसडीआरएफ  पथकाच्या  सहाय्याने साफसफाई करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाद्वारे देण्यात आल्या.

केंद्रीय पथकाद्वारे किन्ही - जुगनाळा गावालगतचा  180 मीटर लांब क्षेत्र असलेला  बी-3  कालवा पुराच्या पाण्याच्या दाबामुळे फुटल्याने आजूबाजूच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी सुद्धा पथकाद्वारे करण्यात आली.

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी  नागरिकांशी  व शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीबाबत व पूर परिस्थितीबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून  घेतली. गावकर्‍यांनी व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या  व्यथा पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

0000000  

No comments:

Post a Comment