सुचनांचे योग्य पालन करून जात प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करावा : विजय वाकुलकर
चंद्रपूर दि. 4 सप्टेंबर : सन 2020-21 मध्ये वर्ग 12 वी विज्ञान शाखा, व्यावसायीक अभ्यासक्रम, सेवा आणि निवडणुक विषयक ऑनलाईन पध्दतीने जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करताना सुचनांचे योग्य पालन करावे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र समिती विजय वाकुलकर यांनी केले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली माहे ऑगस्ट 2020 पासुन ऑनलाइन पध्दतीने प्रकरणे स्वीकारण्यात येत असुन अर्जदाराने आपले शैक्षणिक, सेवा व निवडणुक विषयक प्रस्ताव सादर करतांना खालीलप्रमाणे सुचना पाळण्यात यावे. जेणेकरुन ऑनलाईन प्रणाली हाताळतांना अडचणी होणार नाही. ऑनलाईन www.barti.maharashtra.gov.in या प्रणालीवर फार्म सादर करणे. अर्ज सादर करतांना युजर मॅन्युवल वरील माहिती वाचुनच अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी. अर्ज शक्यतो स्वतः भरावे अथवा स्वतः उपस्थित राहुन व्यवस्थित माहिती सादर करावी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्दारे मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड जपुण ठेवावे सायबर कॅफे अथवा इतरांना देवु नये. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतांना ई-मेल आणि मोबाईल नंबर स्वतःचा टाकणे कारण वेळोवेळी प्रकरणाची अद्ययावत माहिती आपले ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज सादर करतांना काही मुळ प्रमाणपत्रे स्कॅन करुन अपलोड करावे लागतात. त्यामुळे छायांकित प्रती अपलोड करु नये. यामध्ये अर्जदाराचे मुळ जात प्रमाणपत्र, अर्जदाराची टिसी अथवा दाखल खारीज रजिस्टर उतारा, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला (वडील अशिक्षीत असल्यास इतर नावाचा पुरावा), तसेच जातीदावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950 पुर्वीचे, विमुक्ती जाती व भटक्या जमातींकरीता 21 नोव्हेंबर 1961 पुर्वीचे व इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गाचे उमेदवारांनी 13आक्टोंबर 1967 पुर्वीचे) महसुली पुरावे सादर करावे.
अर्जदाराचे जात प्रमाणपत्राव्यतिरीक्त इतर कुणाचेही जात प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीमध्ये सादर करु नये. मुळ शपथपत्रे आणि प्रतिज्ञापत्र ऑनलाईन प्रणालीमध्ये सादर करणे छायांकित प्रती अपलोड करु नये. अर्जदाराने ऑनलाईन फार्म भरतांना सायबर कॅफे मध्ये स्वतःच्या उपस्थितीत माहिती तपासुन फार्म भरावा शक्यतो आपणाकडे उपलब्ध असलेले जातीदावा सिध्द करणारे सर्वच मुळ पुरावे सादर करावे.जेणेकरुन आपणास वारंवार सायबर कॅफे येथे भेट द्यावी लागणार नाही. तसेच काही अडचणी उद्भवल्यास ऑनलाईन प्रणालीवरील हेल्पलाईनशी संपर्क साधुन आपल्या समस्याचे निरसन करुन घ्यावे.
वरील सुचनांचे योग्य ते पालन करुन आपला परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment